Saturday, 11 November 2017

किरोव हत्याकांड आणि स्टालिनचे दमनयंत्र


रशियन राज्यक्रांती ( ऑक्टोबर क्रांती) ला नुकतेच ७ नोव्हेंबर २०१७ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाले. विसाव्या शतकावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख ऐतिहासिक घटनांमध्ये रशियन राज्यक्रांतीचा अग्रक्रमाने समावेश होतो. रशियन राज्यक्रांतीनंतर इतिहासात पहिल्यांदाच साम्यवादी राजवट सत्तेवर आरूढ झाली जिच्याकडे समाजातील उच्चनीचतेच्या उतरंडीला मोडीत काढनारे शासन म्हणून मोठ्या आशेने पाहिले जात होते. १९२४ साली लेनिनच्या मृत्यूनंतर त्याचा उत्तराधिकारी होण्यासाठी मुखत्वे पार्टीचा स्टालिन आणि रेड आर्मीचा प्रमुख असलेल्या ट्रोट्स्की यांचात मुख्य संघर्ष होता. ट्रोट्स्कीची प्रतिमा हि,एक साम्यवाद कोळून प्यालेला,जनतेत प्रचंड लोकप्रिय असलेला तसेच लेनिननंतर सर्वाधिक महत्वाचा कुशल सेनानी अशी होती शिवाय स्वतःचा उत्तराधिकारी म्हणून लेनिन ची पसंती हि त्यालाच होती असे म्हणण्यास पुष्कळ वाव आहे. ह्याउलट स्टालिन हा पक्ष संघटनेवर पोलादी पकड असलेला,थोडासा हुकुमशाही प्रवूत्तीचा व फारसा अभ्यासू नसलेला नेता म्हणून प्रसिद्ध होता. थोर मुसुद्दी असलेल्या ट्रोट्स्कीला बाजूला सारून स्टालिन सोविएत संघाचा प्रमुख होईल अस तेंव्हा फार कोणाला वाटलं नसेल. पण पुढील ३-४ वर्षात पक्षांतर्गत अत्यंत धूर्त राजकारण करून स्टालिन, पक्ष तसेच सरकारचा प्रमुख झाला. त्या साठी सुरुवातीला त्याने जेष्ठ बोल्शेविक तसेच पक्षातील प्रतिस्पर्धी असलेल्या कॉम्रेड कामनेव व कॉम्रेड झीनोवेव व त्यांच्याशी बिनसल्यानंतर बुखारीनशी हातमिळवणी करून ट्रोट्स्कीच्या नेतृत्वाखालील पक्षातील डाव्या गटाला शह दिला. १९२९ च्या अखेरीस ट्रोट्स्की देशाबाहेर पाठवला गेला होता व पक्षांतर्गत विरोध संपून स्टालिन सर्वशक्तिमान बनला होता.स्टालिन ने लेनिनच्या च्या धोरणात काही महत्वाचे बदल केले होते जसे कि शेतीचे सक्तीने सामुदायिकीकरण करण्यात आले ह्यात कित्येक शेतकऱ्यावर प्रचंड अन्याय झाला , रशियाच्या मागासलेल्या भागात औद्योगिकीकरणाची प्रक्रिया तीव्र करण्यात आली,पहिल्यांदाच एका देशात समाजवाद (socialism in one country) हि पक्षातील डाव्यांना अजिबात मान्य नसलेली व त्यांच्या दृष्टिने संकुचित भूमिका, सोविएत युनियनची अधिकृत भूमिका झाली. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून औद्योगिकदृष्ट्या युरोपातील मागासलेले राष्ट्र म्हणून ओळखले जाणारा सोवियत रशिया, इतर देश जागतिक महामंदीच्या विळख्यातून अद्यापि बाहेर पडले नसताना एक औदयोगिक महासत्ता म्हणून उदयास आला. १९३४ च्या सुमारास स्टालिनची सत्तेवरील पकड बर्यापैकी घट्ट झाली होती, पक्षातील विरोधकही नरमले होते तसेच सोविएत संघ ही बऱ्यापैकी प्रगतीपथावर होता. रशियन क्रांतीचा इतिहास स्टालिनने नव्याने लिहून त्यातून ट्रोट्स्की आदी जेष्ठ बोल्शेविकांचा उल्लेख हटविला गेला होता. अजून हि आतून मात्र स्टालिन धास्तावालेलाच होता , जूने जाणते बोल्शेविक (Old Bolshevik) अजूनही सुप्तपणे विरोधातच होते, ट्रोट्स्कीची देशाबाहेर हकालपट्टी केली असली तरी तो अर्जेतीनातुन स्टालिनविरोधी लिखाण करत होता , व्याखाने देत होता.... एकंदर अश्या परीस्थितीत स्टालिन आपल्या पक्षांतर्गत विरोधकांचा बिमोड कसा करावा याचा विचार करत असतानाच , किरोव हत्याकांड घडले ( किंवा जाणीवपूर्वक घडवून आणले गेले) आणि स्टालिनच्या हाती आयता कोलीत मिळाला.. १९३४ पासून ते दुसर महायुद्ध सुरु होइ पर्यंत स्टालिन ने आपल्या जवळ जवळ सर्व विरोधकांचे निर्दालन केले .. राज्याक्रांतीत आघाडीवर असलेल्या जेष्ठ बोल्शेविकांची पूर्ण फळीच्या फळी (काही अपवाद वगळता) खोटे खटले चालवून संपून टाकली गेली , १९४० मध्ये ट्रोट्स्कीचीही अर्जेन्तिनात राहत्या घरी सोवियत हस्तकाकरवी हत्या केली गेली .. कित्येक राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या किंवा त्यांना दूर सायबेरीयात पाठवण्यात आले. ह्या सगळ्या गोष्टींची सुरवात ज्या पासून झाली त्या कॉम्रेड किरोवच्या हत्याकांडाची माहिती घेणे म्हणूनच उद्बोधक ठरेल सेर्गेई किरोव हा साम्यवादी पक्षाच्या लेनिनग्राड (आत्ताचे सेंट पिटर्सबर्ग) शाखेचा प्रमुख होता.. त्याने १९०५ आणि १९१७ ह्या दोन्ही राज्याक्रांतीत तो सहभागी झाला होता.. किरोव हा त्याच्या अभ्यासपूर्ण मतासाठी प्रसिद्ध होता, त्याचा शेतीचे सक्तीचे सामुदायीकीकरण, एका देशात समाजवाद या स्टालिनच्या धोरणांना पूर्ण पाठींबा होता. लवकरच किरोव हा स्टालिन च्या खास सहकार्यांपैकी एक झाला. पक्ष्यांतर्गत वेगळे मत मोकळेपणे मांडता यावे या साठी तो आग्रही असायचा आणि त्याच्या ह्याच गुणविशेषामुळे त्याच्या कडून देशाला, स्टालिनच्या पोलादी चौकटीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवण्याची आशा निर्माण झाली. किरोव ची लोकप्रियता उत्तरोतर वाढत जाऊ लागली, स्टालिनला स्वतंत्र विचार करण्यार्या जवळच्या माणसाची वाढती लोकप्रियता साहत होत नसे.. पण किरोवची खरी प्रतिभा समोर आली ती कमुनिस्ट पार्टी कॉंग्रेसमध्ये स्टालिनला त्याच्यापेक्षा जास्त नकारात्मक मते मिळाली तेंव्हा.. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून स्टालिनने किरोव ला 'पोलिटब्युरो' चा सदस्य म्हणून कामकरण्यासाठी मास्कोला येणाचे निमंत्रण दिले पण प्रत्यक्षात त्याला लेनिनग्राडच्या जबाबदारीतून मुक्त करायचे स्टालिन टाळत राहिला, हे जवळपास ९ महिने चालले. १९३४ मध्ये किरोवचे कार्यालय अद्यापही लेनिनग्राडच्या स्मोलेन्स्क्य इन्स्टिट्यूट मध्येच होते, मागील काही महिन्यांपासून तो माँस्कोला जाण्याच्या तयारीत होता.... त्याची हत्या झाली तेंव्हा त्याच्या संरक्षणासाठी फक्त ४ सुरक्षारक्षक तैनात होते .. त्याचा मित्र फिलिप मेदवेद हा गुप्तचर संस्था NKVD चा स्थानिक प्रमुख म्हणून किरोवच्या सुरक्षाव्यवस्थेवर देखरेख ठेवत होता. असं सांगितलं जात कि स्टालिनच्या आदेशानेच किरोवच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली होती. १ डिसेंबर १९३४, किरोव ऑफिसमध्ये पोहचून त्याच्या कक्षाकडे जात असताना, लियोनिद निकोलयाव नावाचा एक तरुण त्याच्या समोर आला व स्वतःकडील रिव्हॉल्व्हरने त्याने किरोववर तीन गोळ्या झाडल्या. कॉम्रेड किरोव जागीच मृत्युमुखी पडला. किरोवची हत्या हि एका बेरोजगारी आणि नैराश्याने गांजलेल्या युवकाने वैयक्तीक सूड भावनेतून केलेली कृती होती,का ती एका व्यापक राजकीय षड्यंत्राचा भाग होती , हे पाहण्यापूर्वी किरोवच्या हत्याकांडाचे परिणाम समजावून घेणे आवश्यक ठरते .. किरोवच्या हत्येनंतरची काही निरीक्षणे विचारात घेण्यासारखी आहेत. हत्येचे कारण काहीही असो, स्टालिननें या हत्याकांडाचा उपयोग स्वतःचे राजकीय प्रस्थ वाढवून सोव्हिएत संघाचा सर्वशक्तिमान नेता होण्यासाठी केला. एक तर या हत्येने किरोव च्या साम्यवादी पक्षातील वाढत्या प्रभावाच्या भीतीतून स्टालिन मुक्त झाला होता. तरीसुद्धा किरोवच्या हत्येचे राजकीय भांडवल करून किरोवच्या पश्चात त्याचे 'व्यक्ती महात्म' तयार करणे स्टालिनच्या हिताचेच होते.. त्यामुळे वेगवेगळ्या सार्वजनिक वास्तुंना किरोवचे नाव देणे सुरू झाले जसे की युक्रेन मधल्या एका शहराला किरोवचे नाव देण्यात आले तसेच अगदी युद्धनौकेच्या एका प्रकाराला किरोवचे नाव देण्यात आले.. सोव्हिएत गुप्तचर संस्था NKVD च्या लेनिनग्राड प्रमुखाची उचलबांगडी करून त्याच्या ठिकाणी स्टालिनच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीला नेमण्यात आले,ज्याने किरोववर प्रत्यक्ष गोळीझाडली त्या लियोनिद निकोलयाव तसेच किरोवच्या असलेल्या अवघ्या ४ सुरक्षा रक्षकांपैकी, किरोवचा जवळचा मित्र असलेल्या कमिसर बोरिस ची उलट तपासणी स्वतः स्टालिनने घेतली,असं पहिल्यांदाच घडत होतं .. दुसर्या दिवशी सकाळीच बोरीसचा चालत्या ट्रकमधून खालीपडून मृत्यू झाला तर त्याच्या बायकोला कायमस्वरूपी मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले.. किरोवचे हत्याकांडने सोविएत इतिहासाला तसेच एकूणच माणुसकीला काळीमा फासणाऱ्या राजकीय हत्याकांड म्हणता येईल अश्या दमनयंत्राची सुरुवात केली, फरक इतकाच की स्टालिनने किरोव हत्याकांडाचे निमित्त करून पध्द्तशिरपणे खटले चालवून , आरोपींकडूनचं ( अर्थात अमानुष छळ करून) न्यायालयात मिळवलेल्या देशद्रोहाच्या कबुलीजबाबच्या आधारे कायदेशीर प्रकिया राबवून बहुतेक राजकीय विरोधक संपविले.. हे सर्व ज्याची इतिहासात The Great Purge अशी नोंद झाली, जगावर दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमा होऊ लागे पर्यंत चाललं ( १९३४-१९३८).. इ स १९४१ ला नाझी जर्मनीने ऑपेशन बार्बारोसा द्वारे सोव्हिएत युनियन वर आक्रमण केले आणि रशियन राष्ट्रवादाला साद घालत आतापर्यंत जर्मनीच्या बाजूने असणाऱ्या स्टालिनने जनमत आपल्याकडे आकर्षित करून घेतले.. सर्व सोविएत नागरिकांनी आपल्या नेत्याला फॅसिस्ट राष्ट्रांविरुद्ध पुकारलेल्या ग्रेट पेट्रोटिक वॉर ( दुसरे महायुद्ध ) मध्ये तन-मन-धनाने साथ दिली ! दमन यंत्रणा व्यवस्थित चालावी म्हणून स्टालिन ने नवीन कायदे बनवले ज्याद्वारे जनरल सेक्रेटरी स्टालिन ला अनिर्बंध अधिकार प्राप्त झाले. सर्व प्रथम त्याने, सुरुवातीपासून वैचारिक शत्रू असलेल्या जुन्या बोल्शेविकांपैकी कामनेव, झिनोविणेव, आणि बुखारींन यांना किरोवच्या हत्याच्या आरोपावरून अटक केली, त्यांचा अनन्वित छळ करून (खोटे) पुरावे तयार केले गेले व शेवटी त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना/सहकार्यांना गोळ्याघालून मृत्यूदंड दिला गेला... स्टालिनने हळू हळू त्याचा मोर्चा दुसऱ्या फळीतील नेत्यांकडे वळविला, शेवटी गुप्तहेर संस्थेच्या प्रमुख यगोडा ज्याने स्टालिनला 'हे' सर्व करण्यात साथ दिली त्या यगोडाला सुद्धा देशविरोधी कृत्यासाठी जबाबदार ठरवून मृत्यूदंड दिला गेला... ह्या सगळ्यातून कृशचेव्ह, बेरिया , मोलतोव सारखे काहीचं जण वाचू शकले कारण त्यांनी स्टालिनला अश्या अमानवी कृत्यात निमूटपणे साथ दिली. किरोवच्या हत्येमागाचे रहस्य:
हत्येनंतर थोड्याच कालावधीत लियोनिद निकोलयाव ला अटक करण्यात आली.. दोषी ठरवून त्याला फाशी दिले गेले व त्याच्या कुटुंबीयापैकी बहुतेक लोकांना एक तर मारण्यात आले किंवा दूर सायबेरियातील लेबर कॅम्प मध्ये पाठविण्यात आले.. सगळा घटनाक्रम पाहता ही हत्या निकोलयाव ह्या एका माथेफिरू ने केली असेल ह्या वर विश्वास बसण्यासारखी परिस्थिती नाही, बऱ्याच जणांना ह्या मागे स्टालिनला हात असावा असे वाटते.. 1956 च्या साम्यवादी पार्टीच्या काँग्रेस मधील प्रसिद्ध सीक्रेट स्पीच" द्वारे सेक्रेटरी कृशचेव्हने स्टालिनच्या काळ्या- कारनाम्यांचा पर्दापाश् करताना सुद्धा किरोव हत्याकांडामध्ये स्टालिनच्या सहभाग असण्याची शक्यता वर्तवली.. पहिल्यांदा सेक्रेटरी कृशचेव्हच्या काळात व त्यानंतर ३४ वर्षांनी मिखाईल गोर्बाचेव्हच्या कार्यकाळात किरोव हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी समित्या नेमल्या गेल्या पण दोन्ही समित्या किरोवच्या हत्येमध्ये स्टालिनच्या सहभाग असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहचू शकल्या नाहीत. ह्या हत्याकांडावर अनेक पुस्तके आली, बहुतेकांवर अर्थात पश्चिमेच्या भूमिकेचा प्रभाव होता.. अलीकडील काळात अमेरिकन लेखक म्यथ्थु लेनोए ने लिहिलेल्या पुस्तकात केलेली किरोव हत्याकांडाची वस्तुनिष्ठ मांडणी अनेकांना भावली पण तो सुद्धा हत्येत स्टालिनचा सहभाग असल्याच्या कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहचत नाही. कारण काहीही असो, आजमितीला तरी कुणाकडेही किरोव हत्याकांडातील स्टालिनच्या सहभागाची निश्चित माहिती उपलब्ध नाही, तरीही एक गोष्ट मात्र सर्वमान्य आहे, ती ही की स्टालिनने किरोव हत्याकांडाचा उपयोग करून हजारो नव्हे तर लाखो लोकांना मृत्यूच्या दारी पाठवले.

1 comment:

  1. सर यावर एक वर्तमानकाळाला साम्य असेल असा चित्रपट नक्किच रशियामध्ये बनायला हवा
    पण बनणार नाही कारण सद्य परिस्थिती खरोखरच तशी असणार आहे.
    पुतीन हा स्टालिनचा मानसपुत्रच असावा की काय असे वाटते
    बाकी तुमचा लेख मनात चित्रपट मात्र बनवून गेला

    ReplyDelete

Living Beyond Logic

For centuries, human beings have been thinking about how we make sense of the world. As someone who has always leaned towards science and ...