Monday, 28 November 2016

मॅक्सिमिलिएन रॉब्सपीयर: फ्रेंच राज्यक्रांतीचा नायक ते खलनायक

फ्रेंच राज्यक्रांती हि आधुनिक जगाच्या इतिहासातील एक क्रांतीकारी घटना आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या श्वाश्वत मूल्यांच्या प्रेरणेने झालेल्या फ्रेंच राज्यक्रांती ने नव्या जगाच्या निर्मित्तीत महत्वाची भूमीका बजावली . कोणतीही घटना/व्यक्ती ह्या काळसापेक्ष असतात त्यामुळे त्यांनी स्थापित केलेली मूल्य देखील त्या परिपेक्षातच बघायला हवीत. फ्रेंच राज्यक्रांती देखील ह्याला अपवाद नाही, फ्रेंच क्रांतीच्या प्रणेत्यांमध्ये देखील प्रचंड अंतर्विरोध, परस्परविसंगती होत्या. ह्या सर्वांचा परिणाम म्हणून इ स १७८९ ला झालेल्या क्रांतीच्या परिणामातून अस्तित्वात आलेली राजकीय व्यवस्था केवळ १० वर्षच टिकली इ स १७९९ साला पासून नेपोलियन बोनापार्टचा प्रभाव वाढत जाऊन इ स १८०३ मध्ये तो फ्रान्स चा सम्राट बनला.उण्यापुऱ्या १० वर्षाच्या कालावधीत सुद्धा 3 टप्पे पडतात. पहिला इ स १७८९ ते १७९२ पर्यतच्या संविधानिक राजेशाहीचा ज्यावेळी फ्रेंच नॅशनल असेम्बलीत गिरोंडीन गट प्रभावशाली होता सोबतच सोळावा लुईस नामधारी का होईना पण राजा म्हणून शिल्लक होता व नॅशनल असेम्बली वर पाद्री (1st estate) व उमराव (2nd estate) यांच्या ऐवजी Third estate मधील व्यापारी,वकील,डॉक्टर इ. चं प्रतिनिधित्व वाढले होते. Third estate चे इतर कष्टकरी-कामगार घटक जे क्रांतीत भाग घेण्यात अग्रेसर होते त्यांना सत्तेमध्ये वाटा मात्र जवळपास नव्हता.. सत्तेमध्ये त्यांना वाटा देण्याला बहुतांश गिरोंडीन गटाचा विरोध होता. मतदानाचा हक्कही उच्च्यउत्पन्न असलेल्या मूठभर पुरुष वर्गालाच होता. अर्थात ही तरतूद हि त्या काळाच्या मानाने क्रांतिकारक म्हणता येईल अशीच होती. दुसरा टप्पा १७९२ साली राजेशाहीच्या समाप्तीनंतर पहिले फ्रेंच प्रजासत्ताक अस्तित्वात आल्यापासून ते रॉब्सपीयरच्या अंतापर्यंत (जुलै १७९४ ) चालला. ह्या काळात सत्ता जहाल जॅकोबीन (jacobins) गटाच्या हातात एकवटली. जॅकोबिन्स हे third estate च्या कष्टकरी-कामगार वर्गाचे प्रतिनिधित्व करत होते. तिसरा टप्पा हा 'सामूहिक नेतृत्वाचा'(Rule by directory) होता जो नेपोलियनच्या उदया पर्यंत चालला . ह्या पार्श्वभूमीवर रॉब्सपीयरची भूमिका तपासणे हा प्रस्तुत लेखाचा विषय आहे. मॅक्सिमिलिएन रॉब्सपीयर हे फ्रेंच राज्यक्रांतीतील कमालीचे वादळी व्यक्तिमत्व. काहीजण त्याच्याकडे फ्रेंच इतिहासातला नायक म्हणून तर बरेचसे लोक हजारो निर्दोषांना गिलोटीन ला पाठविणारा क्रूरकर्मा म्हणून पाहतात. आज फ्रान्स मध्ये पॅरिस मधील अडगळीत पडलेल्या मेट्रो स्टेशन व्यतिरीक्त मॅक्सिमिलिएन रॉब्सपीयरच्या नावाने कोणतेही स्मृतिस्थळ/वास्तू नाही.. रॉब्सपीयर चा जन्म ६ मे १७५८ साली एका वकील कुटुंबात झाला. त्याचे वडील व आजोबा दोघेही वकील होते. रॉब्सपीयर ६ वर्षाचा असतानाचं त्याच्या आईचे निधन झाले व त्यानंतर वडिलांनी घर सोडले. रॉब्सपीयर व त्याच्या भावंडांचा सांभाळ त्यांच्या आत्याने केला. शालेय जीवना पासूनच रॉब्सपीयर ला अभ्यासात चांगली गती होती, वयाच्या २३व्या वर्षी शिष्यवृत्तीसह त्याने कायद्याची पदवी संपादन केली. रॉब्सपीयरच्या मनामध्ये गरीबांविषयी विशेष कणव होती, अनेक खटल्या मध्ये त्याने जोरकसपणे गरिबांची बाजू मांडली. जीन जॅक्स रुसोचा रॉब्सपीयरवर फार प्रभाव होता, रुसोच्याच विचारसरणीवर आधारीत cult of supreme being चा रॉब्सपीयरने फ्रेंच प्रजासत्ताकाचा कॅथॉलिक धर्माऐवजीअधिकृत धर्म म्हणून पुरस्कार केला. इ.स. १७८९ ला जेंव्हा बॅस्टील चा पाडाव होऊन फ्रेंच राज्यक्तांतीची सुरुवात झाली त्याच्या दोन महिने आधी वयाच्या तिशीत असलेल्या रॉब्सपीयर ची estate General मध्ये third estate चा एक प्रतिनिधी म्हणून निवड झाली. Estate General मध्ये लवकरचं जॅकोबीन क्लब चा एक महत्वाचा वक्ता म्हणून रॉब्सपीयरची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. फ्रेंच राज्यक्रांती जरी स्वातंत्र्य, समता व बंधुता ह्यांना केंदिभूत ठेऊन झाली असली तरी पूर्वी लिहल्याप्रमाणे, वेगवेगळ्या गटांच्या ह्या बाबतच्या संकल्पना भिन्न स्वरूपाच्या होत्या. रॉब्सपीयर सुरुवातीपासूनच बंडखोर व लोकशाहीवादी जॅकोबीन क्लबचे प्रतिनिधित्व करत असे. त्याच्यामते सर्व आर्थिक-सामाजिक थरातील पुरुषांना ( स्त्रियांना नव्हे) समान अधिकार मिळायला हवेत त्याचबरोबर फ्रान्स तसेच फ्रेंच वसाहतीमधील गुलामगिरीची अमानुष प्रथा समूळ नष्ट केली जाणे आवश्यक आहे असे त्याचे मत होते. पण फ्रेंच राज्यक्रांतीच्या सुरवातीच्या काळात गिरोंडिस्ट गटाचे वर्चस्व होते ज्यांना गरीब,कामगार व कर न भरणाऱ्या नागरिकांचा सत्तेतील वाटा मंजूर नव्हता. अश्या स्तिथीत सहाजिकच रॉब्सपीयर कष्टकरीवर्गात (sans-culottes) प्रसिद्ध झाला. रॉब्सपीयर हा बऱ्यापैकी उदारमतवादी होता तसेच त्याचा सुरवातीच्या काळात देहदंडाच्या शिक्षेवर विश्वास नव्हता, असे असताना तो 'दहशतीच्या राज्याचा ' प्रमुख बनला जेथे हजारो नागरिकांचा शिरच्छेद करण्यात आला. अर्थात रॉब्सपीयर मध्ये हा बदल एकाएकी घडला नव्हता...... १७८९ च्या क्रांती नंतर अनिर्बंध राजसत्ता जाऊन सांवैधानिक राजेशाही आली पण त्याचा सामान्य जनतेला फारसा उपयोग झाला नव्हता,उलट शेजारच्या प्रशिया, ऑस्ट्रिया व रोमन सैन्याच्या मदतीने प्रतिक्रांती करून पुन्हा सोळावा लुईस ह्याच्या नेतृत्वाखाली अनियंत्रित राजेशाही स्थापण्याच्या प्रतिक्रांती गटाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. स्वतः लुईस चा (कुठलाही पुरावा नसताना) याला छुपा पाठिंबा असल्याची लोकभावना प्रबळ होत चालली होती. ती तशी करण्यात जॅकॅबिन्सचे महत्वाचे योगदान होते. ह्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर १७९२ मध्ये राजेशाही पूर्णपणे उलथवून पहिले फ्रेंच प्रजासत्ताक अस्तित्वात आले, आपसूकच त्याचे नेतृत्वही मवाळ गिरोंडिस्ट गटाकडून प्रबळ अश्या जहाल जॅकोबिन्स गटाच्या हाती आले. जॅकोबिन्सच्या बहुतांश सदस्यांचा राजकीय हिंसेवर गाढा विश्वास होता. जेंव्हा अटकेत असलेल्या राजा लुईस (सोळावा) ह्याच्या शिरच्छेदाचा मुद्दा समोर आला तेंव्हा आतापर्यंत देहदंडाच्या शिक्षेविरोधात असलेल्या रॉब्सपीयरने , 'क्रांती जिवंत राहण्यासाठी लुईस चे मरणे आवश्यक आहे', ह्या शब्दात लुईसच्या शिरच्छेदाचे समर्थन केले. जानेवारी १७९३ मध्ये लुईसला गिलोटिन वर देण्यात आले. दरम्यानच्या काळात जॅकोबीन गटाचा वरचस्मा वाढतच गेला, या उलट गिरोंडिस्ट गटाला आहोटी लागली. ६ एप्रिल १७९३ मध्ये मॅक्समीन इसनार्ड व डान्टन च्या पुढाकारातून ९ सदस्यीय जनसुरक्षा समिती ( committee on public safety) ची स्थापना करण्यात आली जी लवकरचं सर्वशक्तिमान बनली. जुलै १७९३ मध्ये त्या समितीवर रॉब्सपीयरची नेमणूक करण्यात आली, अल्पावधीतचं सत्ता रॉब्सपीयरच्या हातात एकवटली. इतिहासात पहिल्यांदाच दहशत ( Terror) हि सरकारची अधिकृत भूमिका बनली. दहशतवादाच्या प्रचलित व्याखेनुसार, दहशतवादी हे सरकार विरुद्ध हिंसाघडवून आणणारे व्यक्ती/संघटना असतात तर १७९३ मध्ये फ्रान्स मध्ये सरकार हेच दहशतवादा चे वाहक बनले. डान्टननेही सरकार पुरस्कृत दहशतीचे समर्थन करताना म्हटले की , "जर लोकांकडून क्रांतीच्या मूल्यांविरोधात होणारी हिंसा रोखायची असेल तर सरकारने स्वतः हिंसेचा स्वीकार करणे आवश्यक आहे." पुढे रॉब्सपीयरशी झालेल्या मतभेदानंतर डान्टनचाही शिरच्छेद करण्यात आला. दहशतीच्या या कालखंडात गिलोटिनवर देण्यात आलेल्यांची अधिकृत संख्या 1६ हजार असली तर प्रत्येक्षात २ लाखाहून अधिक लोकांना संपवण्यात आले. स्वतःच्या नैतिकतेच्या कल्पना व दहशत यांचा मेळ बसवण्याचा रॉब्सपीयरचा प्रयत्न होता. रुसोच्या कल्पनेतील नैतिक प्रजासत्ताक (Republic of virtue) स्थापन करणे हा त्याचा उद्देश होता, त्या प्रजासत्ताकात सर्वांनी स्वतःच्या भौतिक सुखापेक्षा इतर देशवासीयांच्या आनंदाचा विचार करणे अपेक्षित होते. जो असे करणार नाही त्याला संपवणे आवश्यक आहे असा रॉब्सपीयरचा युक्तिवाद होता. तो स्वतः अविवाहित होता व अतिशय साधे जीवन जगत असे, भाड्याच्या एखाद्या छोट्याश्या खोलीत तो राहत असे. संपूर्ण आयुष्यात तो भष्ट्राचारापासून पूर्णपणे दूर होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचा लिलाव केला असता तिची किंमत १०० पौंड सुद्धा भरली नाही. पण ह्या रॉब्सपीयरच्या दहशतीच्या राज्याच्या शेवटच्या काळात त्याच्या अगदी जिवलग मित्रांचाही बळी गेला. त्या पैकी दोन महत्वाची नावे म्हणजे , डेसम्यलीन आणि डान्टन. डेसम्यलीन हा रॉब्सपीयरचा शाळकरी मित्र तर डान्टन जवळचा सहकारी. डेसम्यलीनवर त्याने त्याच्या मासिकातून जनसुरक्षा समितीविरोधात काहीबाही लिहलयं असा आरोप होता त्यावर रॉब्सपीयरने डेसम्यलीनला मासिकाची जाहीर होळी करण्याची सूचना केली. डेसम्यलीनने रुसोचा हवाला देऊन सांगितले की अंक नष्ट करणे हा काही पर्याय होऊ शकत नाही. शेवटी डान्टन व डेसम्यलीन ह्या दोघांचाही मार्च १७९४ मध्ये शिरच्छेद करण्यात आला. ह्या सर्व घटनांचा परिणाम म्हणून कि काय कारकिर्दीच्या अखेरच्या काळात रॉब्सपीयर अस्वस्थ असायचा, बऱ्याचदा तो सर्वांशी संपर्क तोडून स्वतःला खोलीत कोंडून घेत असे. रॉब्सपीयर हा कधीही सरकारचा किंवा जनसुरक्षा समितीचा प्रमुख नव्हता तर तो फक्त कमिटीचा एक प्रभावशाली सदस्य होता. सहजीकचं समितीतील इतर सदस्य हि हिंसेला जबाबदार होते. उलट इतर सदस्य हे काही वैयक्तीक जीवनात रॉब्सपीयर इतके सरळमार्गी नव्हते. त्यातल्या बऱ्याच जणांनी समितीतल्या सदस्यपदाच्या जोरावर वैयक्तिक स्वार्थासाठी बरीच गैरकृत्ये केली होती , बक्कळ माया जमवली होती. रॉब्सपीयरच्याही हे हळूहळू लक्षात यायला लागले होते. त्याने मित्र सेंट जस्ट च्या मदतीने अश्यांची यादी बनवून त्यांना संपवण्याचे ठरवले. प्रतिनिधीसभे ( National convention ) समोर २ तास चाललेल्या भाषणात मागच्या वर्षभरात झालेल्या गैरकृत्यांना , निर्दोषाच्या हत्यांना जबाबदार असणाऱ्या जॅकोबीन प्रतिनिधींनाही गिलोटीनला देण्याचे समर्थन त्याने केले, पण त्या भाषणात रॉब्सपीयरने कुणाचेही नाव घेतले नाही. त्यामुळे धास्तावलेल्या रॉब्सपीयर विरोधी प्रतिनिधींनी गुप्त कट केला, त्यानुसार दुसऱ्या दिवशी रॉब्सपीयर व त्याच्या समर्थनार्थ बोलणाऱ्या सेंट जस्ट ह्यांना भाषण देण्यापासून रोखण्यात आले व त्यांचेवर क्रांतीच्या मूल्यांविरोधात काम करणे व डान्टनच्या हत्येचा आरोप ठेऊन अटक करण्यात आले. २८ जुलै १७९४ ला खटला न चालवताचं रॉब्सपीयर, सेंट जस्ट व त्यांच्या सहकार्यांना गिलोटीन वर देण्यात आले.. जॅक्स म्लेट पॅन ने म्हटल्या प्रमाणे , क्रांतीने तिच्याच अपत्यांचा बळी घेतला. आज मृत्यूनंतर २०० वर्ष उलटून हि रॉब्सपीयर हा जाणकारांमध्ये कुतूहलाचा विषय बनून राहिला आहे..
 डॉ अमोल यादव

No comments:

Post a Comment

Living Beyond Logic

For centuries, human beings have been thinking about how we make sense of the world. As someone who has always leaned towards science and ...