Saturday, 21 October 2023
....मुलांनो, आपल्याला चांगले दिवस येणार आहेत
कुणाही शेतकऱ्यासाठी, त्याच्या कुटुंबीयासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची शेतजमीन.. ती फक्त मालमत्ता नसते तर असते कुटुंबाचा आधार बनून असलेली ती एक सर्वव्यापी .. कदाचित, बळी तो कान पिळी ह्या न्यायाने गावाच्या बलदंड आणि शिरजोर व्यक्तीचा त्यावर असलेला डोळा असेल, आणि त्यामुळे जुन्या पिढीकडून संक्रमित झालेली काहीशी भीती ही सुद्धा प्रेरणा जमिनीच्या प्रेमामागे असावी…
माझ्या आजी, आई आणि वडिलांचा सुद्धा इतरा प्रमाणे शेतीवर खूप जीव.. वडील लहान असताना आजोबा गेले त्यामुळे कुटुंबाकडे असलेल्या ३० एकर शेतीला सांभाळण्या साठी वडीलांनी कॉलेज च शिक्षण सोडलं, स्वतःचा स्वप्नाचा त्याग करून वडील पूर्णपणे शेतकरी झाले अगदी तेंव्हा पासून त्यांचे वेश सुद्धा कायम सफेद कुर्ता आणि धोतर हा एकच..( या मागे सुद्धा अभावग्रस्ताता असावी असे मला नेहमी वाटते).
आम्ही भावंडं लहान असताना, फार जास्त पैसे गाठीशी नसताना सुद्धा वडील काटकसर करून, त्यावेळेस कापसाचे पीक बऱ्यापैकी यायचं त्यातून जी काय बचत होईल ती करून थोडी थोडी शेती घ्यायचे आणि अश्या प्रकरे आमचे शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकूण ३५ एकर जमीन कुटुंबाच्या मालकीची झाली..
… त्यावेळेस बाकीच्यांच्या घराच्या तुलनेत आमचं घर अजूनही साधारण म्हणावं असं दोन खोल्या माळवदाच्या आणि बाकी दोन पत्र्याच्या,जमीन सारवनाची होती.
आम्ही नेहमी अण्णाला विचारायचो की, अण्णा आपण फरशी कधी बसवणार आहोत? त्या वर ते नेहमी फार पूर्वी विकत घेतलेल्या आणि एका कोपऱ्यात थप्पी करून ठेवलेल्या फरश्या दाखवायचे (ज्या कधीच बसवल्या गेल्या नाहीत), आई नेहमी सांगायची की तिचं लग्न झालं तेंव्हा परिस्थिती अजूनही वाईट होती, भिंतीतून कायम माती बाहेर यायची आणि तिच्या माहेरच्या लोकांना हे कसेचचं वाटायचं…
नेहमी कमीच असणारं शेतीच उत्पन्न एका वर्षी अजून कमी आलं आणि त्यामुळे नवीन कपडे जे बहुधा आम्हा सर्वांना वर्षातून एकदा मिळायची ते सुध्धा शक्य झालं नाही, भावाला सहावी सातवीत असल्यापासून सायकल घ्यायची होती, सायकलला लावायचा हॉर्न सुद्धा त्याने 'कुंभारीच्या' जत्रेतून विकत आणला होता, ( ती घेणं तो बारावीत जाई पर्यंत शक्य झालं नाही..)
आम्ही सगळे जण मिळून वडिलांना म्हणायचो, आण्णा , तुम्ही शेती घेता, त्यापेक्षा थोडी शेती विका पण आम्हाला प्रत्येक सणाला कपडे घ्या, आजी सोडून कुणीही याचा विरोध करायचे नाही…
पण शेतकऱ्यांसाठी शेती विकणे ही काळीज विकण्यासारखी गोष्ट… असे असताना देखील वडिलांनी एकूण तीन वेळेस मिळून 17 एकर जमीन विकली…
पहिल्यांदा शिक्षणा साठी नंतर लग्नासाठी आणि नंतर लग्न झाल्यानंतर झालेले कर्ज देण्यासाठी..
पहिल्यांदा शेती विकताना अण्णांनी मनाची चलबिचल बाहेर दाखवली नाही, आजी ला वाईट वाटत होते तिच मन शेती विकण्यास अजिबात तयार होत नव्हतं, पण तिच्या एकुलत्या एक अण्णा ने तिला, "बाई पोरं मोठी झाल्यावर तुला घेऊन देतील परत", असं सांगितलं म्हणून शेवटी बाई तयार झाली..
तरी, आजी नेहमी आम्हाला म्हणायची, "मी हाये तोवर मई जमीन परत घेऊन द्या "…
जमीन विकताना वडिलांचं एकररेशीय कारण होत,आपण साधे जीवन जगलो, आपल्या किंवा आपल्या जवळपास आर्थिक स्थिती असणाऱ्या किंवा आपल्या पेक्षा कमी आर्थिक स्थिती असणाऱ्यापेक्षा सुद्धा आपलं राहत घर खूप साधारण आहे.. सगळ्या भिंती मातीच्या आहेत, ते मातीचे ठेवलं कारण घर विकून काही पैसा येणार नाही आणि योग्य वेळ आली तर शेतीचं कामाला येईल, कारण योग्य असेल तर विकताना काही वाटणार नाही ..
पहिल्यांदा विकलेली जमीन आजीच्या भावानेच विकत घेतली. आज अतिशय मूल्यवान असणारी जमीन २० वर्षांपूर्वी त्यांनी आधी ३० हजार रु. प्रती एकरचा सौदा करून प्रत्येक्षात आमची अडचण लक्षात आल्यानंतर अवघ्या एकराला २५ हजार रुपयात विकत घेतली याचे बाईला सर्वात जास्त वाईट वाटले..
.. त्यानंतर पुढील काही वर्षात आम्हा सर्वाचा शिक्षणाचा खर्च वाढला पण शेतीतून येणार उत्पन्न होत त्यापेक्षाही कमी झालं.
कधी खूप उदंड ऊस आला तर कारखान्याला जाण्यावाचून पडून राहायचा … एकंदरीत ४ वर्षांनी परिस्थिती पुंन्हा खूप अवघड बनून गेली
या चक्रातून सुटण्यासाठी शेती विकण्याशिवाय काही पर्याय दिसत नव्हता… कणखर असलेल्या अण्णांच मनसुद्धा एक एक पैसा साठवून विकत घेतलेल् शेत विकायचं म्हटल्यावर, जरा खालीवर होऊ लागलं,
…वडील आठ पंधरा दिवसातून आम्हाला भेटायला परभणीला यायचे, परिस्थिती एवढी बिकट झाली होती की परभणीला येण्याच्या वेळात अंतर वाढत होत, कारण दरवेळी यायला लागणारं तिकीट सुद्धा महाग वाटू लागलं ..
.. त्या वेळेस आमचा खर्च भागविण्यासाठी वडिलांनी एक पर्यायी मार्ग निवडला तो म्हणजे, आमच्या शेतात बरेच झाडं होती, त्याचे लाकूड गावातील लोकांना आणि बाहेरच्या छोट्या लाकूड व्यापाऱ्याला विकून त्यातून महिन्याला ४००-५०० रुपय मिळवायचे आणि आम्हाला परभणीला आणून द्यायचे…
अशी परिस्थिती टकमक टोकावर असताना,एक दिवस वडील परभणीला आले … त्यांनी आईने आमच्या साठी लिहलेले पत्र सोबत आणलं होतं..
… आम्हाला आईला काही बोलायचं असेल तर आम्ही वडिलांकडे पत्र लिहून द्यायचो पण यावेळेस पहिल्यांदाच आईने आम्हाला पत्र लिहिलं होतं..
दि-३०/११/२००५
श्री
तीर्थरूप बाईस रामपुरीतून आपली सून सौ शेषकला यादव चा नमस्कार , चि अतुल, आमोल, ओमप्रकाश ला माझा गोड गोड पापा. अरे मुलांनो माझे घरी आवरले नाही म्हणून मी येऊ शकले नाही त्या मूळे तुमच्या वडिलांना पाठवित आहे. आणी त्यांच्या सोबत मी एक पत्र देत आहे त्या पत्राचा काळजी पूर्वक विचार करून तुम्ही वागा आणि माझा हा निर्णय समजा, मुलांनो तुमचे वडिल (आळंदी) यात्रेहुन आल्या नंतर मला सांगितल कि आपन शेत विकायचे नाही असचं धकवायचे. परंतु पोरांनो सध्याच्या तारखेला आपनास उत्पन निघत नाही आणी आपले (बहिणीचे) लग्नाचे काम होत नाही मग काय कराव? तरी पण मुलांनो आपला विचार जर डळमळत राहिला तर आपन काही हि करू शकणार नाहित. एकनिष्ठ राहून आपन आता असेच संपूर्ण काम करण्याची गरज आहे तरी पण मूलानो मी हि तुमच्या वडिलांना हेच सांगणार आहे. शेत विकले ते विको त्या मध्ये काहिही बदल करू नका. काळजी पूर्वक लक्ष घालून मूलीचे लग्न करा. तिन्ही मूलानो माझे म्हणने आयाका आणि पैसे आल्यावर नंतर त्यांचा योग्य पद्धतीने वापर करा, आणी आपली सध्याची अडचन दूर करा. नंतर आपल्याला चांगले दिवस येणार आहेत. पुढच काळजी करण्याची गरज नाही. मूलानो तुमच्या वडिलांची सुद्धा शेत विकण्याची तयारी आहे पण या वेळेस त्यांचे शेतावरचे मन उठत नाही. त्यांच्या मनात सारखा विचाराचा गोंधळ निर्माण झाला आहे तरी पण तुम्ही त्यांना समजून सांगा आणि त्यांच्या मनातील गोंधळ काढून टाका म्हणजे आपले काम सोपे होईल. ओम, आमोल, आतूल तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही तूम्ही हूशार आहात तरी पण माझे सांगणे आवरते तुम्ही लक्ष पूर्वक वाचा आणि विचार करा
तुमची आई,
सौ शेषकला मंचकराव यादव
रामपूरी
<आईचे हे पत्र अण्णांनी अक्षरश: मनावर घेतलं आणि शेत विकण्याचा निर्णय घेतला.
ह्या नंतर २ वर्षांनी पुन्हा तिसऱ्यांदा शेत विकल तेंव्हा आजीला सांगायची आम्हा कोणाची हिम्मत झाली नाही.
आज मागे वळून पाहताना आई-अण्णा आणि बाई च्या हिमतीला आणि त्याही पेक्षा त्यांच्या प्रेमाला, ज्याने आमचे भविष्य घडविले, शब्दात मांडता येईल असे शब्द नाहीत…
आणि अण्णा बाई ला म्हणायचे की,"पोरं मोठी झाल्यावर घेऊन देतील शेती", ती शेती बाई असताना तरी घेऊ शकलो नाही आणि भविष्यात मी घेऊ शकेल असेही वाटत नाही…
कदाचित, एका पिढीच्या निस्सीम प्रेम आणि त्यागावरच पुढील पिढ्या उभ्या राहत असाव्यात…
डॉ अमोल यादव
दिनांक २१/१०/२०२३
पुणे
Subscribe to:
Post Comments (Atom)
Living Beyond Logic
For centuries, human beings have been thinking about how we make sense of the world. As someone who has always leaned towards science and ...
-
The Ganesh festival, for me, has always been more about the atmosphere than strict religious practices. Since I was in 12th grade, I haven’t...
-
For centuries, human beings have been thinking about how we make sense of the world. As someone who has always leaned towards science and ...
-
I like all kinds of books, but I have a special interest in books dealing with the matters of evolution and science. “Why We Die – The New S...
No comments:
Post a Comment