Tuesday, 6 June 2023
हुरहूर
मनाला हुरहुर लागून जाते … आजकाल खूप जास्त…
मी इयत्ता ९ वी ला मध्ये रामपुरीच्या शाळेतून परभणीच्या शाळेत प्रवेश घेतला , नवीन शाळा, नवीन पोरं, भीती वाटायची शहराची, शहरातल्या पोरांची l, नवीन शिक्षकांची … नव्या शाळेत जरी ती शाळा साधीच असली आणि बहुतेक विद्यार्थी एक तर बेताची किंवा गरीब म्हणता येईल अस्या परिस्थितीतील असले तरी ती पोरं गावाकडून आलेल्या मुलांची मजा घ्यायची, त्यांना वाटायचं की मला खोटे मार्क्स मिळाले आहेत आणि प्रत्येक्षात मी काही फार हुशार नाही… त्या मुळे नवीन गावाकडचा पोरगा म्हणून त्रास द्यायची.. त्यामुळे वर्गातल्या गरीब आणि दीनवाणा चेहरा असणाऱ्या किंवा अभ्यासात काहीच हुशार नसणाऱ्या पण धातिंगड मुलांशी मैत्री केली.. वर्गातील २-३ टॉपर तर माझ्याकडे दया भावनेने असे बघायचे की खेड्यातून शहरात (?) आलेला बिचारा… आणि उगीच बघून हसायची! त्यांनी काय जोक केला असावा ते अजून लक्षात येत नाही.
आम्ही रहायचो गिरी डॉक्टर च्या वाड्यात , मालक डॉ गिरी मोठ्या मनाचे अतिशय सद्गृहस्थ…
८ बाय १० च्या रूम मध्ये आम्ही राहायचो…आण्णा मला पहिल्यांदा घेऊन आले होते तेंव्हा त्यांनी रूम चा आकार ओम ला सांगितल्याचे आठवते… म्हणजे त्याचं रूममध्ये सर्व समान आणि एक महिन्यापूर्वीच घेतलेली ओमची सायकल… बाई, ओम आणि मी … ओम एक वर्ष आधी आला होता आणि बराच mature वाटायचा.. सकाळी बाई माझ्या आधी उठून सगळं आवरून द्यायची..
…..तस बघितलं तर नववी ची शाळा सुरू होण्यापूर्वी मी आधी पंधरा दिवस उन्हाळ्यात परभणीला येऊन राहिलो होतो पण ती रंगीत तालीम आणि प्रत्यक्षात राहणं यात फरक होता.. उन्हाळयात राहून परत गावाकडे गेलो तर सगळी कडे तीच चर्चा.. गोविंदाची आई म्हणाली, तुझ्या आई ने सांगितलं तू ओमा आणि आजीकडे राहायला गेला होतास करमतय का बघायला ! मग करमल का ? आता परभणीच्या शाळेत जाणार ना? परभणीला शाळेत जायला मी अण्णाला हो तर म्हणलं होत पण मनात हो म्हणव का नाही सारख वरखाली होत होत … पण पुढे काय होईल ते होईल हो म्हणून दिल पण रामपुरी आणि शाळा सोडून जाताना खूप रडू येऊ लागल, आई आण्णाला सोडून जावू नये वाटू लागले, अण्णा सोडून मी कधीच राहत नव्हतो, त्यांना सोडून जावं लागू नये म्हणून मामाच्या गावाला सुद्धा जायचे टाळायचो
…… २२ जून १९९८ ला परभणीला गेलो , शाळा सुरू झाली , शाळेत काही फार करमत नव्हतं थोडा थोडा अभ्यास करायचा ओळखीचं कोणीच नव्हतं.. शाळा संपल्यावर घरी आलो तर बाई आणि मी बसायचो गप्पा मारत .. हळूहळू दुपारच्या सुट्टीत ओम ने मला थोडी थोडी सायकल शिकवली.. त्याच्या दुपारच्या कॉलेजला सुट्टी मध्ये मी हळूहळू आधी सायकल ढकलत ढकलत थोडे पुढे पळवत पळवत सायकल वर बसायचो आणि मग नंतर डायरेक्ट बसायला शिकलो होतो माझे माझे वय त्यावेळेस 13 वर्षाच्या जरा कमीच होत… मग मी नंतर नंतर ओम दुपारी गच्ची वर नाही तर रूम वर अभ्यास करायचा तेंव्हा बाहेर जाऊन सायकल चालवायचो.. सहकार नगर, प्रभावती नगर , मिसळ नगर असा राऊंड माऱ्याचो.. फिरायचं, कधी कधी धडकायचं, पायावर पडायचं, मग बाईला लक्षात यायला लागलं की हा एकटा सायकल चालवायला घाबरतो, बाई म्हणायची काही नाही मी येऊन बसते गिरी डॉक्टरच्या ओट्यावर, ओटा त्या कॉलनी मधला जो मुख्य रस्ता होता त्यालगत होता, बाई तिथे येऊन बसायची, मला हुबेहूब आठवतेय… माझ्या सायकलचा एक राऊंड पूर्ण होऊन दर पंधरा मिनिटाला मी घराजवळ ओट्या जवळ यायचो आणि मी दिसलो की, बाई लांबूनच, ह चांगला चालवतोस अमूल म्हणायची.. कधी कधी बोळक्या दाताने हसायची.. आणि मला सायकल चालवण्यात मजा यायला लागली… बाई शिळोप्याच्या गप्पा करताना फार रंगवून जुन्या गोष्टी सांगायची त्यात पण आता मध्ये मध्ये सांगू लागली की ओमा, अमूल सायकल नादर चालवतो मध्ये मध्ये घंटी सुद्धा वाजवतो…
असे एक दोन महिने गेले, जुलैचा शेवट असेल, नागपंचमीच्या वेळेस बाईने काहीतरी आमटी केली पुरणपोळी करण्यासारखी परिस्थिती नव्हती..
बाईने आठवणी सांगता सांगता सांगितले, अण्णा तुझ्या एवढा असताना, नागपंचमीलाच माझे आजोबा म्हणजे बाईचा नवरा वारले, खूप दिवस आजारी होते, घरी भरपूर शेत असूनही अबाळ होत चालली होती … आजोबा गेल्या नंतर दुःख करायला सुद्धा वेळ मिळाला नाही, सकाळी माती होई पर्यंत रात्र भर कुणी आलं नाही, शेजाऱ्यांनी दरवाजे लावून घेतले फक्त उत्तमराव तेवढे आले म्हणाले पोरग लहान आहे भिऊन जाईल, मला आयुष्यभर ही गोष्ट लक्षात राहील, अण्णा उत्तंभाऊ विषयी केवळ एवढ्या गोष्टीमुळे खूप चांगलं बोलायचे,
पण, "अण्णा तुझा एवढा असताना नागपंचमीच्या जवळपास" झालेली गोष्ट ऐकून मी फार धसका घेतला, आण्णा ला काही झालं तर आमचं कसं होईल, आम्ही दोघं, बाई, आई, लहान भाऊ आणि ताई !
आणि अण्णा दर दहा पंधरा दिवसाला डोक्यावर गहू तांदूळ डाळ किराणा इ. सामान घेऊन यायचे बसस्टँड वरून….
म्हणजे सहकार नगर साडेतीन-चार किलोमीटर होत बसस्टँड पासून … ऑटो पाच रुपये घ्यायचा पण त्यांनी ते नेहमी वाचवले … कदाचित एवढे पैसे देणे शक्य नसेल.. त्यामुळे आण्णा हाच आम्हाला नव्या जगाला जोडणारा एकमेव धगा होता…अण्णांची आम्हाला शिकवण्याची इच्छाशक्ती हीच आमची एकमेव जमापुंजी त्या मुळे मी रोज देवाला प्रार्थना करायला लागलो…
आण्णानंतर मला आधार वाटायचा ओमचा .. तो बराच प्रौढ असल्या सारखा वागायचा, महिन्याचा हिशोब ठेवायचा, मला आठवतंय अडीचशे रुपये भाडं आणि 170 रुपये इतर खर्च असा महिन्याला खर्च व्हायचा…
सगळा खर्च त्यातूनच भगवयाचा, आणा पैसे ओमला द्यायचे, सर्व हिशोब ओम आणि अण्णा यांनीच बघितला…
तरी मनात खूप प्रश्न यायचे देवाला धावा करायचो सायकल शिकली होती थोडी सायकल चालवताना मस्त वाटायचं, सगळं विसरून जायचो…
मग मला वाटते पोळ्याला ऑगस्ट १९९८ च्या शेवटच्या आठवड्यात अण्णा परभणीला आले आणि अण्णासोबत परत पहिल्यांदा मी गावाकडे गेलो चार-पाच दिवस राहिलो… जाताना पोखरणीपर्यंत गेलो आणि पोखरणी मध्ये आम्हाला रामपुरी चे मुल पोखारणीला शाळेत शिकायला होते त्यात माझा जवळचा मित्र दिलीप सुद्धा होता ते भेटले आणि आम्ही खूप गप्पा मारल्या नंतर जणू काही नवीन जगातून आलोय एवढ्या गप्पा झाल्या आणि आम्ही सगळे गावाकडे गेलो आणि चार दिवस राहून, आईला भेटून परत आलो.. ऑगस्ट नंतर जरा हुरहूर कमी व्ह्यायला लागली, पूर्णांशाने नसलो तरी थोड रुळायला लागलो…
… आयुष्यात त्या पूर्वी कधी न जाणवलेली हुरहूर मला या जून ते ऑगस्ट 1998 ह्या दोन महिन्यात जाणवली… त्यावेळी परभणीत बोलायला मनातल्या गोष्टी सांगायला बाई होती, ओम होता…
पंचवीस वर्षां नंतर पहिल्यांदाच हुरहूर परत जाणवायला लागलीय.. आता बाई नाही, ओम सुद्धा लांब गेला आहे, अण्णाचाच मुख्य आधार आहे पण त्यांना त्रास देऊ नये असे वाटते … मागचे कित्येक वर्ष तेच तेच बोलत आलोय ...
आता काय ही हुरहूर आयुष्यभर संपेल असं वाटतं नाही…
Subscribe to:
Post Comments (Atom)
Living Beyond Logic
For centuries, human beings have been thinking about how we make sense of the world. As someone who has always leaned towards science and ...
-
The Ganesh festival, for me, has always been more about the atmosphere than strict religious practices. Since I was in 12th grade, I haven’t...
-
For centuries, human beings have been thinking about how we make sense of the world. As someone who has always leaned towards science and ...
-
I like all kinds of books, but I have a special interest in books dealing with the matters of evolution and science. “Why We Die – The New S...
No comments:
Post a Comment